मातृपूजन
- jaymini.shrividya

- Oct 10, 2019
- 1 min read

श्रीविद्या प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थांनी दि.७ ऑक्टोबर २०१९ रोजी शाळेत मातृपूजनाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
नवरात्रीचा उत्सव म्हणजे देवीचा, शक्तीचा उत्सव. जगात आल्यावर आपली पहिली ओळख आपल्या आईशी होते. आई म्हणजे मुलांना जाणवलेली स्त्रीशक्तीच असते. आणि स्त्रीशक्ती नेहमीच पूजनीय असते. यासाठीच आईचे महत्व विद्यार्थ्याना कळावे, त्या निमित्ताने त्यांच्यावर आणखी एक चांगला संस्कार व्हावा म्हणून श्रीविद्या प्राथमिक शाळा दरवर्षी नवरात्रात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मातृपूजनाचा कार्यक्रम आयोजित करते. तसेच नवरात्रीत कुमारिकेचे विशेष महत्व असते. आणि कुमारिका ही सुद्धा स्त्रीशक्तीचेच प्रतिक. म्हणून नवरात्रीत शाळेत खेळवाडीच्या विद्यार्थिनींचे कुमारिका पूजनही करण्यात येते.
यावर्षी देखील शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या सोहळ्याचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांच्या मातापालकाना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या आईची प्रत्येक विद्यार्थ्याने अगदी मनोभावे पूजा केली. नंतर सर्वाना पेढ्यांचा प्रसाद, आणि दुग्धपान देण्यात आले. या भावपूर्ण सोहळ्यात सगळ्या मातापालकांच्या डोळ्यात समाधान आणि आनंदाश्रू दिसत होते. श्रीमती सुहासिनी खरवडकर यांनी विद्यार्थ्याकडून मातृपूजनाचे विधी करवून घेतले. हा विधी झाल्यानंतर अनेक मातापालकांनी सद्गदित स्वरात आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आईविषयीच्या त्यांच्या भावना एका कागदावर लिहून आईला सरप्राईज गिफ्ट दिले.
याप्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका नीला अष्टपुत्रे म्हणाल्या की,
“आपल्या आईबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असायलाच हवा, तो वाढायला हवा. तसेच तो व्यक्तही करता यावा. आईचे महत्व विद्यार्थ्यांना कळायलाच हवे. या हेतूने शाळेने मातृपुजनाची ही प्रथा सुरु केली आहे.”
या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका इरा पांडे आणि जयमिनी मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या इतर शिक्षिकांनी त्यांना सहकार्य केले.



Comments